कुलदीप घायवट
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली आरे दुग्ध वसाहत मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जंगल. मुंबईतील प्रदूषण, तापमान नियंत्रण यात या जंगलाचा वाटा मोठा आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांबरोबरच कीटकांची समृद्ध जीवसृष्टी आरेमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळून येते. त्यात जवळपास १५० विविध प्रजातींच्या कोळय़ांचा (स्पायडर) समावेश आहे. यापैकी आरे वसाहतीमधून ‘जम्पिंग स्पायडर’ जातीमधील ‘जेर्झिगो’ या पोटजातीमधील नव्या कोळय़ाच्या प्रजातीचा शोध लागला. या कोळय़ाला तेथील वन अधिकाऱ्याचे नाव देण्यात आले. तेव्हापासून या कोळय़ाला ‘जेर्झिगो सुनील लिमये’ असे म्हटले जात आहे. सुनील लिमये हे १९८८ बॅचचे आयएफएस अधिकारी आणि राज्याचे माजी वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.
मुंबईतील आरे दुग्ध वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणात जैवविविधता असली तरी सध्या आरे वसाहतीला अनेक धोके निर्माण झाले आहेत. या धोक्यात मोठय़ा प्राण्यांचे स्थलांतर, त्यांच्या वसाहतींची हानी दिसून येते. मात्र, कोळ्यासारख्या लहान प्रजातींची कुठेच गणना होत नाही. गेल्या काही वर्षांपासून जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांनी आणि त्यांच्या गटाने आरेमधील कोळ्याच्या सहा नवीन प्रजातींचा शोध घेतला. त्यात ‘जेर्झिगो सुनील लिमये’ या प्रजातीचा शोध त्यांनी लावला आहे.
जगभरात जम्पिंग स्पायडरच्या एकूण ६,५३४ प्रजाती आहेत. भारतात जवळपास २६० प्रजाती आढळल्या आहेत. जगभरात जेर्झिगो पोटजातीमधील तीन प्रजाती आहेत. यातील एक प्रजात चेन्नई आणि श्रीलंकेमध्ये आढळून येते. तर उर्वरित दोन प्रजाती आग्नेय आशियाकडील बॅर्निओ आणि सुमात्रा येथे दिसून येते. त्यामुळे राजेश सानप यांनी २०१६ साली आरेमध्ये शोधलेली जेर्झिगो ही ज्ञात तीन प्रजातींपैकी एक आहे की नवीन प्रजाती आहे, याचा सलग तीन वर्षे अभ्यास करण्यात आला. २०१७ साली आठ मादी जेर्झिगो आणि दोन नर जेर्झिगोंवर संशोधन करण्यात येत होते. त्यांचा वीणीचा काळ, प्रजनन काळ तसेच त्याच्या बाह्यांगाच्या छायाचित्राचे परीक्षण करून अखेरीस २०१९ मध्ये आरे वसाहतीमधून नव्याने सापडलेला जेर्झिगो प्रजातीचा कोळी हा ‘जेर्झिगो’ पोटजातीतील चौथी प्रजात असल्याचे समोर आले. त्याचे नाव जेर्झिगो सुनील लिमये असे ठेवण्यात आले. आरे वसाहतीमध्ये आढळून आलेल्या नर जेर्झिगोची साधारणपणे लांबी ५.५२ मिमी आणि मादी जेर्झिगोची साधारणपणे लांबी १०.३० मिमी असते. या कोळय़ांचा रंग काळसर आणि अंगावर सोनेरी-पिवळे पट्टे असतात. या प्रजातीवर आणखीन संशोधन सुरू असून त्यांच्या संख्येचा शोध घेतला जात आहे. मात्र, आरेमध्ये विविध कारणांनी चहुबाजूंनी सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे जीवसृष्टी धोक्यात येत आहे.