मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथील व्यावसायिक आणि निवासी अशा एकूण सात भूखंडांच्या ई-लिलावासाठीच्या निविदा काही दिवसांपूर्वी खुल्या झाल्या. त्यानुसार सातपैकी केवळ तीन भूखंडांना प्रतिसाद मिळाला असून, या भूखंड विक्रीतून एमएमआरडीएला किमान २९७४ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता एमएमआरडीच्या तिजोरीत आणखी किमान ६५६ कोटी रुपयांची भर पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीएच्या बीकेसीतील आणखी तीन व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडाच्या ई-लिलावाच्या निविदा शुक्रवारी खुल्या करण्यात आल्या असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या निविदेनुसार बीकेसीत लवकरच ज्युपिटर वा फोर्टीसचे रुग्णालय, तसेच डी. वाय. पाटील वा भारती विद्यापीठाचे महाविद्यालय उभे राहण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या १०,०२६.४४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी मुंबईतील नामांकित अशा ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पीटल लिमिटेड आणि फोर्टीस हॉस्पीटल लिमिटेडने निविदा सादर केल्या आहेत. दुसरीकडे ५११७.८५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या शैक्षणिक वापरासाठीच्या भूखंडासाठी डी. वाय. पाटील आणि भारती विद्यापीठ यांनी निविदा सादर करून भूखंडासाठी उत्सुकता दर्शविली आहे. सध्या या निविदांची एमएमआरडीएकडून छाननी सुरू आहे.

‘एमएमआरडीए’ला २९७४ कोटी मिळण्याची शक्यता पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीच्या निधी उपलब्धतेसाठी एमएमआरडीने २०२४ मध्ये सुरुवातीला सात भूखंडांच्या ई-लिलावासाठी एकत्रित निविदा मागविल्या. त्यानंतर काही दिवसांनी आणखी तीन व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडासाठी निविदा प्रसिद्ध केल्या. सात भूखंडाच्या विक्रीतून एमएमआरडीएला किमान ५९४६ कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. मात्र सध्या तरी एमएमआरडीएला किमान २९७४ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. सात भूखंडांच्या निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या असून सातपैकी केवळ तीन भूखंडांनाचा प्रतिसाद मिळाला आहे. एका व्यावसायिक भूखंडासह तीन निवासी भूखंडांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे या चार भूखंडांसाठी पुन्हा निविदा काढल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन भूखंडांसाठी कॅनडा, सिंगापूर आणि जपानमधील कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.