बाल न्याय मंडळाची (जेजेबी) दिशाभूल करून खून प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुख्य आरोपी दाखवणाऱ्या दिंडोशी पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने अतिरिक्त पोलीस आयुक्तांना (उत्तर विभाग) दिले. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी या पोलीस अधिकाऱ्याची ५० हजार रुपयांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने त्याला मुख्य आरोपी दाखवून ठाणे कारागृहात ठेवण्याची व्यवस्था केली, असा आरोप आहे.
प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देताना या मुलाला तातडीने ठाणे कारागृहातून डोंगरी येथील बालसुधारगृहात हलवण्याचे आदेशही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने कारागृह प्रशासनाला दिले. हा आरोपी अल्पवयीन आहे की नाही हे निश्चित होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक जीवन खरात यांच्याकडे सोपवण्याचे आणि खरात हे अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाकडून सर्व संबंधित कागदपत्रे गोळा करतील व ती बाल न्याय मंडळासमोर ठेवतील, असे आदेशही न्यायालयाने दिले.
अल्पवयीन आरोपीने वडिलांमार्फत केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. घटनेच्या वेळी म्हणजेच १३ ऑगस्ट २०२१ रोजी आपण १६ वर्षांचे होतो, असा दावा त्याने याचिकेत केला आहे. तसेच त्याला प्रकरणात मुख्य आरोपी न मानता अल्पवयीन आरोपी मानले जावे, अशी मागणी केली आहे. आपल्याला पहिल्यांदा डोंगरी येथे बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि बालसुधारगृहात ठेवण्यात आले. परंतु, काही दिवसांनंतर वाघ यांनी आपल्या वडिलांना फोन करून आपल्या वयाशी संबंधित कागदपत्रे मागितली. त्यानुसार, आपण शिकत असलेल्या शाळेने दिलेले प्रमाणपत्र आणि आपले आधार ओळखपत्र वडिलांनी वाघ यांना दिले. त्यावर आपली जन्मतारीख ४ जून २००५ नमूद होती.
या कागदपत्रांच्या मूळ प्रती परत करण्यासाठी वाघ यांनी वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. ती पूर्ण करण्यास वडिलांनी असमर्थता दाखवल्यावर वाघ यांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज करून आपले वय जाणून घेणाऱ्या चाचणीसाठी परवानगी मागितली. मंडळाच्या परवानगीनंतर आपली नागपाडा पोलीस रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात आपले वय २० ते २१ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर मंडळाने वाघ यांना आपल्या नियमित न्यायालयासमोर हजर करण्यास परवानगी दिली, असे याचिकेत म्हटले आहे.