मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदल ही काळाची गरज असल्याचे मतही उभय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जुलमाच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी या वेळी केले. देशात बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. थोडा वेळ लागेल, पण सारे संघटित होतील आणि चित्र बदलेल. ही लढाई लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आहे, असे राव म्हणाल़े   

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजप आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार यांची त्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते.

देशासमोरील मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांची निंदानालस्ती आणि बदनामी करण्याचाच प्रयत्न केला जातो. सुडाचे राजकारण हे हिंदूत्व किंवा भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही, असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला. सध्याची परिस्थिती बघितल्यावर देशाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तरुण वर्गाला आपण काय संदेश देत आहोत, असा सवालही ठाकरे यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्व विषयांचा ऊहापोह करण्यात आला आणि भविष्यातील बदलासाठी आजपासून सुरुवात करीत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत जुलमी राजवटीच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमिवरून सुरू होणारा लढा यशस्वी होतो, असे सांगत परिवर्तनाच्या या लढाईचे परिणाम नक्कीच चांगले दिसतील, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी राव यांची कन्या आणि माजी खासदार के. कविता, चित्रपट अभिनेता प्रकाश राज, तेलंगण राष्ट्र समितीचे नेते, शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ िशदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते. राव यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना हैदराबाद भेटीचे निमंत्रण दिले.

बारामतीत बैठक

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सारे काही सुरळीत सुरू नाही. हे चित्र बदलणे ही काळाची गरज आहे. यासाठी साऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. समविचारी पक्षांशी चर्चा सुरू आहे. लवकरच बारामतीमध्ये सर्व समविचारी पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, असे तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

विकासावर चर्चा : पवार

बेरोजगारी आणि गरिबी हे देशासमोरील गहन प्रश्न आहेत. विकास महत्त्वाचा आहे. राव यांच्याबरोबरच्या भेटीत राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्दय़ावर अधिक चर्चा झाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राव यांना राजकीयदृष्टय़ा फार काही महत्त्व देत नाही, असेच सूचित केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांची निंदानालस्ती करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत देशाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे बदलासाठी आजपासून सुरुवात करीत आहोत.

      – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

जुलमी राजवटीच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमीवरून सुरू होणारा लढा यशस्वी होतो. देशात बदल घडविण्याच्या या लढाईचे नक्कीच परिणाम चांगले दिसतील.

      – चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगण