शिळफाटा येथील इमारत दुर्घटना घडल्यानंतर जागे झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. पालिकेच्या डोंबिवली पश्चिम ‘ह’ प्रभागातील नवापाडा, जयहिंद कॉलनीमधील काही अनधिकृत इमारतींना भोके पाडून तोडण्याचा देखावा करण्यात आला. शिळफाटा येथील दुर्घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाविषयी ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान, डोंबिवली पश्चिमेकडे १० अनधिकृत इमारती आणि १५७ अनधिकृत चाळींविरोधात दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेने कारवाईची सुरुवात केली होती; परंतु भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या चाळींमधील कथित गरिबांची घरे वाचविण्याच्या नावाखाली नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मध्यस्थीने या कारवाईस स्थगिती दिली. त्यामुळे सदर कारवाईला खो बसला. चव्हाण यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशा प्रकारे डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्यामुळे अनधिकृत इमले उभारणारे तथाकथित बिल्डर आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ संबंधांची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
डोंबिवली पश्चिमेत गेल्या तीन वर्षांपासून भूमाफिया, नगरसेवक, त्यांचे समर्थक, आमदार व भागीदारांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. महापालिका अधिकरी, अभियंत्यांची त्यांना ‘साथ’ मिळत आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे यांचे अनधिकृत बांधकामांवर कोणतेही नियंत्रण न राहिल्याने भूमाफिया शिरजोर झाल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे. या टीकेमुळे व्यथित आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना अधिकाधिक ‘एमआरटीपी’ करण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली पश्चिमेत १० अनधिकृत इमारती, १५७ चाळींना पालिकेने यापूर्वीच नोटिसा पाठविल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांवर गेल्या दोन महिन्यापूर्वी कारवाई करण्यात येणार होती. आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही कारवाई झाली तर ५०० कुटुंबे रस्त्यावर येतील या सबबीखाली या कारवाईला नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्याकडून स्थगिती मिळविली होती. असे असताना महापालिकेने अचानक अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू केल्याने आता मंत्र्यांचा ‘स्थगिती आदेश’ गेला कोठे, असे प्रश्न जाणकार नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी ६० भूमाफियांवर फक्त ‘एमआरटीपी’चे गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी मोठय़ा मुश्किलीने पोलीस बंदोबस्तात नवापाडा, जयहिंद कॉलनी भागांतील इमारती तोडण्याची कारवाई करण्यात आली. अनधिकृत चाळींवरही कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम ‘ह’ प्रभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली जातील, असे पालिका उपायुक्त अनिल डोंगरे यांनी सांगितले. पालिकेला तातडीने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
उच्चपदस्थ ‘बाबां’च्या सेवेत दंग
शिळफाटा येथे इमारत दुर्घटना घडून ७४ जीव मृत्युमुखी पडले असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील एक उच्चपदस्थ अधिकारी मात्र आपल्या गुरुबाबांच्या सेवेत गुरुवारपासून लीन झाला होता. शिळफाटा येथे मुख्यमंत्री आले तरी हा अधिकारी तेथे न फिरकल्याने पालिकेत आश्चर्य व्यक्त केले जात होते. ‘तो’ उच्चपदस्थ शुक्रवारीही बाबांच्या सेवेत असल्याने उपायुक्त गणेश देशमुख यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. भूमाफियांशी साटेलोटे असलेले पालिकेचे प्रभाग अधिकारी मोठय़ा मुश्किलीने बांधकामावर कारवाईचे देखावे करू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा