मुसळधार पावसामुळे एकीकडे कल्याण डोंबिवली जलमय झालेली असतांना दुसरीकडे पाणी पुरवठा बंद झाल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. मात्र, मोहने आणि मोईली या दोन्ही पंपिंग स्टेशनवर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामळे कल्याणामधील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी संध्याकाळ तर डोंबिवली आणि २७ गावातील पाणी पुरवठा सुरु होण्यासाठी रात्र होईल, अशी माहिती महापालिकेच्या संबंधित विभागातर्फे देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे मोईली पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले आहे. तर, याच कारणास्तव मोहने पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परंतु, या दोन्ही ठिकाणी महापालिका आणि महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचेही पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत कल्याण आणि डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पाणी पुरवठा बंद असल्याने कल्याण आणि डोंबिवलीत लोकांची प्रचंड गैरसोय होत असून पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसत आहे.