आगामी पालिका निवडणुकीचा विचार करून कल्याण डोंबिवलीतील नागरिकांवर कोणतीही कर वाढ न करणारा, विकासाच्या कोणत्याही नवीन संकल्पना नसलेला, जुनेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची हमी घेऊन तयार करण्यात आलेला पालिकेचा एक हजार ५१६ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने शनिवारी स्थायी समितीला सादर करण्यात आला.
या वेळी पालिका परिवहन समितीचा २२८ कोटींचा, ३५ कोटींचा शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करण्यात आला.
सभापती प्रकाश पेणकर, परिवहन समिती सभापती राजेश कदम, आयुक्त शंकर भिसे, उपायुक्त संजय घरत या वेळी उपस्थित होते.
महसूल वसुलीचे तीन तेरा वाजले असतानाच प्रशासनाने शहरात प्रस्तावित रस्ते, सिमेंट रस्ते, उड्डाणपूल, स्कायवॉकची कामे हाती घेण्याचा निर्धार केला
आहे.
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पहिल्या टप्प्यात २३ रस्ते काँक्रिटीकरणातून करण्यात येणार आहेत. टिटवाळा, ठाकुर्ली येथील पुलांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये नवीन प्रयोगशाळा उभारणे, पालिका शाळांमध्ये इंग्रजी वर्ग सुरू करणे, मुलांच्या आरोग्यासाठी फिजिओथेरपी केंद्र सुरू करणे असे नवीन प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहेत. परिवहन उपक्रमात १८५ बस नव्याने दाखल होणार आहेत. उपक्रमाचा बस ताफा २२५ होणार असल्याने अधिकाधिक तत्पर प्रवासी सेवा देण्याचा प्रस्ताव परिवहन अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.