रेल्वे राज्यमंत्र्यांचा २२ नव्या फेऱ्यांना हिरवा कंदील
होळीचा मुहूर्त साधत रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या २२ नव्या उपनगरी फेऱ्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. या २२ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्या ठाण्याहून, कल्याण आणि सीएसटीवरून प्रत्येकी चार तर दादरवरून दोन फेऱ्या सुरू होणार आहेत. १५ एप्रिलपासून सीएसटी अथवा दादरहून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व जलद गाडय़ा १५ डब्यांच्या होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
ठाणे येथून कर्जत आणि कसारासाठी गुरुवारपासून (२८ मार्च) शटल सेवा सुरू होत आहे. त्यानुसार ठाणे येथून कर्जतसाठी पाच, बदलापूर आणि कसारासाठी प्रत्येकी दोन, आसनगावसाठी तीन अशा १२ फेऱ्या असून कल्याण-कर्जतसाठी एक, कल्याण-आसनगावसाठी तीन, सीएसटी-कल्याणसाठी चार तर दादर-कल्याणसाठी दोन अशा फेऱ्या वाढविण्यात आल्या अहेत. त्याच वेळी बारा डब्यांच्या आणखीन सहा जलद फेऱ्या सीएसटी-कल्याणदरम्यान चालविण्यात येणार आहेत. १५ एप्रिलनंतर या सर्व फेऱ्या १२ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये परावर्तित होणार आहेत. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या १२ डब्यांच्या चार फेऱ्याही १५ डब्यांच्या फेरीत परावर्तित होणार आहेत.
नव्याने वाढविण्यात आलेल्या एकूण २८ फेऱ्यांमुळे दररोजच्या प्रवासी वहनक्षमतेमध्ये ७७ हजारांनी वाढ होणार आहे. नव्या फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या १६१८ इतकी होणार असून मेन लाइनवरील फेऱ्यांची संख्या ८२५ इतकी होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा