महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण आगारात गुरूवारी मध्यरात्रीपासून चालक-वाहकांनी संप सुरू केला आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय चालक,वाहकांना जादा फेऱ्या मारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट संपाचे हत्यार उगारले. अचानक सुरू झालेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण आगारातून दररोज सुमारे ४० ते ५० बसेस दररोज शहर परिसरात आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या मारतात. सुमारे १५० वाहक-चालक हे काम करत असतात. कल्याण आगारातून मुरबाड, भिवंडी, पनवेल, ठाणे, जव्हार या स्थानिक भागात तसेच लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक सुरू असते. या आगारातील चालक, वाहकांवर व्यवस्थापनाने जादा फेऱ्या मारण्याचे बंधन घातले आहे. या जादा फेऱ्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी स्थगिती मिळविली. अशाप्रकारची कोणतीही स्थगिती मिळालेली नाही असा दावा प्रशासनाने केला. तसेच जादा फेऱ्या मारण्याचे नवे आदेशही रुजू केले. व्यवस्थापनाच्या या मनमानी कृतीचा निषेध करण्यासाठी गुरूवारी रात्री बारा वाजल्यापासून कल्याण आगारातील चालक, वाहक संपावर गेले आहेत. अचानक बस बंद झाल्याने प्रवाशांची सर्वाधिक कोंडी झाली. सकाळी काही बस बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. बस वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी गुरूवारी लोकल, खासगी वाहनाने प्रवास करीत होते. अनेक प्रवासी आगारात अडकून पडले आहेत.
आगारातील बहुतांशी बस नादुरूस्त आहेत. रडतखडत त्या चालवाव्या लागतात. रस्त्यात बस ब्रेकडाऊन झाल्यानंतर चालक, वाहकाची कसोटी लागते. या महत्वपूर्ण मागण्यांकडे व्यवस्थापन लक्ष देत नाही. मग, जादा फेऱ्या मारण्याचे ओझे कर्मचाऱ्यांवर का टाकण्यात येत आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सकाळच्या पाळीतील कर्मचारी संपावर असतानाच दुपारच्या पाळीतील कर्मचारी कामावर आले. त्यांनीही संपात सहभागी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा