सुशांत मोरे
मुंबई : प्रवाशांना इंटरनेटवरील माहिती विनाअडथळा उपलब्ध व्हावी यासाठी पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात मोफत वायफाय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. करोनामुळे २०२० मध्ये प्रवाशांची संख्या कमी झाल्याने स्थानकांवरील वायफायवापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली होती. परंतु आजही रेल्वे स्थानकात वायफायचा वापर करणाऱ्यांची संख्या कमीच असून त्यात संथगतीने वाढ होत आहे. आजघडीला मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात वायफायचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. या स्थानकात मे २०२२ मध्ये १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी वायफायचा वापर केला असून सुमारे चार हजार ९४३ गिगाबाईट्सपेक्षा अधिक डेटा वापरण्यात आल्याची माहिती ‘रेलटेल’कडून देण्यात आली. त्यानंतर गजबजलेल्या सीएसएमटी, ठाणे आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकाचा क्रमांक लागतो.
चित्रपट पाहणे, गाणी डाऊनलोड करणे, विविध विषयांची माहिती मिळवणे, एखाद्या ठिकाणी जाणारा रस्ता शोधणे इत्यादीसाठी अनेक जण इंटरनेटवर अवलंबून असतात. रेल्वे प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि इंटरनेटवरील माहिती विनाअडथळा व वेगाने मिळेल, या उद्देशाने २०१५ मध्ये देशभरातील ४०० स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार ‘रेलटेल’ व गुगल कंपनीमार्फत ही सेवा देण्यास सुरुवात झाली. गुगलने मात्र नंतर यातून माघार घेतली.
करोनाचा विळखा, टाळेबंदीमुळे देशभरातील रेल्वे प्रवासावर निर्बंध आले आणि स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली. मेल-एक्स्प्रेसबरोबरच मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासावरही निर्बंध आले आणि त्याचा परिणाम स्थानकातील वायफायच्या वापरावर झाला. वायफायचे वापरकर्ते कमी झाले. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि त्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे प्रवासी संख्येतही वाढ झाली. त्यातुलनेने मध्य आणि पश्चिम उपनगरीय स्थानकांमध्ये वायफाय वापरणाऱ्यांची संख्या मात्र फारशी वाढलेली नाही. करोना संसर्गाच्या भितीमुळे काही जण रेल्वे स्थानकातील गर्दीतून तात्काळ काढता पाय घेत आहेत. त्याचाही परिणाम असावा, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘रेलटेल’ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात प्रवासी मोठ्या संख्येने वायफायचा वापर करीत आहेत. गेल्या मे महिन्यात १५ हजार ११५ प्रवाशांनी एकूण चार हजार ९४३ गिगाबाईट्स डेटा वापरला आहे. त्यापाठोपाठ नेहमीच गजबजलेल्या सीएसएमटी स्थानकातही सहा हजार ७८८ प्रवाशांनी वायफायचा वापर केले. या स्थानकात २,२२५.२९१ गिगाबाइट्स डेटा वापरण्यात आला. जानेवारी २०२२ मध्ये याच स्थानकात पाच हजार ९६ प्रवाशांनी आणि कल्याण स्थानकात नऊ हजार ५३७ प्रवाशांनी वायफायचा वापर केला होता. जानेवारीत ठाणे स्थानकात दोन हजार ४३२, मेमध्ये पाच हजारपेक्षा अधिक, बोरिवली स्थानकात जानेवारीत दोन हजार २०६, तर मेमध्ये चार हजार ७५४ प्रवाशांनी वायफायचा वापर केला.
काही महत्त्वाच्या स्थानकातील मे मधील वायफाय वापरकर्ते (प्रवासी)
चर्चगेट – २,६२३
मुंबई सेंट्रल – २,११०
दादर (पश्चिम रेल्वे) – ३,७२९
अंधेरी – ३,७०८
विरार – २,७२२
दादर (मध्य रेल्वे) – १,८०४
डोंबिवली – ३,६१६
वडाळा – ३,२०२
वाशी – ५,०८५
पनवेल – ४,८९६
वायफायसाठी शुल्क आकारणी
प्रवाशांना मार्च २०२१ पासून वायफायसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वायफायचा ३० मिनिटे मोफत वापर करता येतो. त्यानंतर पुढील कालावधीसाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागत असून ‘रेलटेल’च्या योजनेनुसार, प्रवाशाला दिवसाला पाच जीबी डेटासाठी १० रुपये, तर ३० दिवसांपर्यंत ६० जीबीसाठी ७० रुपये शुल्क आकारण्यात येते.