‘इसिस’च्या वाटेवरून स्वत:हून परतलेल्या आरिफ माजीदवर कट्टर धर्मवेडाचे संस्कार करण्यात आल्याचे त्याच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. त्याच्या चौकशीतून ‘इसिस’संबंधी तसेच भारतातील त्यांच्या प्रभावाविषयी महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.  
आरिफ आणि कल्याणमध्ये राहणारे आणखी तीन तरुण २३ मे रोजी धार्मिक यात्रेसाठी इराकला गेले होते.
त्यांच्यासोबतचे अन्य यात्रेकरू भारतात परतल्यानंतर त्यांनी या चार तरुणांबद्दल अधिक माहिती दिली. हे चौघे बगदादच्या पश्चिमेकडील फालुजाह येथून टॅक्सी करून कुठेतरी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे चारही तरुण ‘इसिस’मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त आले. ऑगस्टमध्ये यापैकी एका तरुणाने आरिफच्या घरी दूरध्वनी करून तो ‘शहीद’ झाल्याचे कळवल्यानंत त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या उत्तरक्रियेचे धार्मिक विधीही केले. मात्र, त्यानंतर आरिफनेच दूरध्वनी करून आपण जिवंत असल्याचे व ‘इसिस’च्या तावडीतून सुटल्याचे कळवले. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर शुक्रवारी तो मुंबईत परतला.
मुंबई विमानतळावरूनच त्याला एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात आरिफवर ‘धर्मवेडा’चे संस्कार करण्यात आल्याचे उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेले सात महिने तो कुठे होता, त्यांनी दहशतवादी प्रशिक्षण घेतले का, त्याचे अन्य मित्र कुठे आहेत तसेच त्याच्या मित्राने आरिफ मरण पावल्याची खोटी माहिती का दिली, याची चौकशी सुरू आहे.

Story img Loader