लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून आंदोलन शुक्रवारी आणखी तीव्र झाले. बेस्टच्या एकूण २७ पैकी १८ आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन सुरू झाले असून १,३७५ बसगाड्या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे बस स्थानक, आगारांमध्ये प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी, कार्यलयांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत असल्यामुळे विविध आस्थापनांमधील कर्मचारीही संतप्त झाले आहेत.
बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा कंत्राटदारांच्या कामगारांनी शुक्रवारीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला विविध आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठींबा मिळू लागला असून आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. त्याची झळ थेट मुंबईकरांना बसू लागली आहे. आंदोलनामुळे १८ आगारांमध्ये बेस्टच्या बसगाड्या उभ्या आहेत. सकाळपासून १,३७५ बस प्रवर्तित झाल्या नाहीत. या आंदोलनात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्विच या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा सहभागी झाले आहेत.
आणखी वाचा-सरकारी रुग्णालयांमध्ये आता पूर्णत: मोफत उपचार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
एसएमटी, मातेश्वरी, हंसा या व्यवसाय संस्थेच्या अनुक्रमे ७६, ३५ आणि १६२ बस शुक्रवारी प्रवर्तित करण्यात आल्या आहेत. या व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटातील अटी व शर्तींनुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
काम बंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतीक्षानगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठाणे या १८ आगारांमध्ये बसगाड्या खोळंबल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये स्वतःच्या मालकीच्या एकूण १,३९० आणि भाडेतत्त्वावरील १,६७१ अशा एकूण ३,०६१ बसगाड्या आहेत.