मुंबई : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रुग्णालयातील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कामा रुग्णालयातील २०० पैकी ९६ कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले होते. मात्र यामुळे रुग्ण सेवेवर पडणारा ताण लक्षात घेत कामा रुग्णालय प्रशासनाने निवडणूक कामासाठी कर्मचारी पाठविणार नसल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवले आहे.

निवडणुकीच्या कामासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यानंतर रुग्णालयातील कामांचा ताण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडतो. रुग्णालयातील साफसफाई, शस्त्रक्रियागृहाची साफसफाई, प्रयोगशाळेतील तपासण्यांचे अहवाल, रुग्ण कक्षातील सेवा, रुग्णांना जेवण देणे अशा विविध सेवांवर याचा परिणाम होत असतो. वैद्यकीय शिक्षण विभागाने निवडणुकीच्या कामासाठी कामा रुग्णालयातील ९६ चतुर्थश्रेणी कर्मचारी पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा…वैद्यकीय शिक्षण संचलनालयाची वाट बिकटच!

u

मात्र कामा रुग्णालयातील एकूण ३४० पदांपैकी १४० पदे रिक्त असून, फक्त २०० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ९६ कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने कामा रुग्णालय प्रशासनाला दिल्या होत्या. रुग्णालयातील ९६ कर्मचारी म्हणजे जवळपास ५० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी गेल्यास त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता आहे. ९६ कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठविल्यास रुग्णालयातील यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेला प्राधान्य देत कामा रुग्णालय प्रशासनाने ९६ कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवणे शक्य नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवले आहे.