गर्भवती महिलांची ठराविक कालावधीमध्ये सोनोग्राफी चाचणी करावी लागते. गर्भवती महिला व बालरुग्णांची कामा रुग्णालयामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सोनोग्राफी करण्यात येत होती. यामुळे गर्भवती महिलांना जे.जे. रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयामधून सोनाेग्राफी करावी लागत होती. परिणामी, महिलांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आता कामा रुग्णालयात महिलांसाठी २४ तास सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार आहे.
प्रसुतीसाठी अनेक महिला कामा रुग्णालयात येतात. गर्भवती महिलांना सोनाेग्राफी करणे आवश्यक असते. मात्र कामा रुग्णालयामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीतच सोनोग्राफी करण्यात येत असल्याने महिलांची अडचण होत होती. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिलांची प्रकृती अत्यवस्थ असल्यास त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. तर काही महिला खासगी केंद्रांवर जाऊन सोनोग्राफी करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयात महिलांसाठी २४ तास सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय कामा रुग्णालयाने घेतला आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून कामा रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांसाठी २४ तास सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या रुग्णालयामध्ये महिन्याला १०० पेक्षा अधिक मातांची सोनोग्राफी केली जाते. या निर्णयामुळे आता महिलांना सोनोग्राफीसाठी जे.जे. रुग्णालयात वा खासगी केंद्रावर जावे लागणार नाही. महिलांचा त्रास कमी होईल, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
मोफत होणार सोनोग्राफी
सोनोग्राफीसाठी दोन नवीन यंत्रे आणण्यात आली आहेत. तसेच लहान मुलांची सोनोग्राफी करण्यासाठीही नवीन यंत्र आणण्यात आले आहे. गर्भवती महिलांची सोनोग्राफी मोफत होणार असल्याची माहितीही डॉ. तुषार पालवे यांनी दिली.