मुंबई : गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणावांमुळे गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे कामा रुग्णालयाने केलेल्या एका अभ्यासात आढळले आहे.

गर्भधारणेच्या वेळी महिलांमध्ये मधुमेहाची सामान्य लक्षणे दिसून येत नाहीत. हार्मोन बदलांमुळे मधुमेह होतो. शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतरित करते. इन्सुलिन संप्रेरक अन्नातून साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. इन्सुलिन योग्य काम करीत नसल्यास वा शरीरात पुरेसे इन्सुलिन नसल्यास रक्तात मोठ्या प्रमाणात साखर तयार होते गर्भधारणेच्या वेळी नाळेतील हार्मोन्स इन्सुलिनच्या कार्यपद्धतीत व्यत्यय आणतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊन मधुमेह जडतो. गर्भधारणेच्या २४ ते २८ आठवड्यांदरम्यान मधुमेह झाल्याचे लक्षात येते. गेली दोन वर्षे महिलांसाठी विशेष रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयात गर्भधारणेच्या वेळी होणाऱ्या मधुमेहाबाबत अभ्यास करण्यात येत आहे. त्यात गर्भावस्थेतील महिलांना मधुमेह होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा…वर्सोव्यात अल्पसंख्याक मतांवर भवितव्य, भाजपसाठी लढत कठीण

गर्भधारणेच्या वेळी नाळेतील हार्मोन्स इन्सुलिनच्या कार्यपद्धतीत व्यत्यय आणतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊन मधुमेह जडतो, असे कामा रुग्णालयाने केलेल्या एका अभ्यासात आढळले आहे.

बाळावर परिणाम

गर्भधारणेदरम्यान मधुमेह झाल्यास बाळामध्ये जन्मत: हृदयदोष, अपरिपक्व फुप्फुसे, जास्त लाल रक्तपेशी निर्माण होऊन रक्तवाहिन्या आतड्यांमध्ये अडथळा होतो, बाळ लठ्ठ असणे, मुलाला फेफरे येणे, अकाली जन्म, बाळाला टाइप २ चा मधुमेह होण्याचा धोका असतो.

गेल्या दोन वर्षांत कामा रुग्णालयात महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान गर्भवतींना मधुमेह झाल्याचे निदर्शनास आले. या महिलांची सखोल वैद्याकीय तपासणी केली असता गरोदरपणातील संप्रेरके बदलांसह त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणावामुळे मधुमेहाच्या प्रमाणात वाढत झाल्याचे निदर्शनास आले आहे. – डॉ. तुषार पालवे, वैद्याकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

हेही वाचा…साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा

कारणे काय?

या महिलांची अधिक तपासणी केली असता त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणावामुळे त्यांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह झाल्याचे निदर्शनास आले.

गर्भधारणेदरम्यान कोणालाही मधुमेह होऊ शकतो. मात्र हृदयरोग, उच्च रक्तदाब, गर्भधारणेपूर्वी लठ्ठपणा किंवा अधिक वजन, टाइप-२ मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.