मुंबई : महिलांचे गर्भाशय खाली येणे, मूत्रपिशवी खाली येणे, आपोआप लघवी होणे अशा समस्यांवर सहज उपचार व्हावेत यासाठी कामा रुग्णालयामध्ये अद्ययावत विशेष मूत्ररोगशास्त्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागामुळे कामा रुग्णालयात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड येथून येणाऱ्या महिलांना अधिक चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या विभागाचे येत्या काही दिवसांमध्ये उद्घाटन होणार आहे.
कामा रुग्णालयात मुंबई व मुंबई बाहेरून गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिला उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. या महिलांना अधिकाधिक व अद्ययावत सोयी-सुविधा व उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयामध्ये मूत्ररोगशास्त्र विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अद्ययावत सोयी-सुविधा या सायट्स आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पूर्ण सोयी-सुविधांनी युक्त व अद्ययातव असा हा सरकारी रुग्णालयातील पहिलाच विभाग आहे. या विभागामध्य रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. या कक्षामध्ये महिलांचे गर्भाशय खाली येणे, लघवीची पिशवी खाली येणे, मूत्र आपोआप बाहेर पडणे अशा विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा…जागतिक हृदय दिन : केईएम रुग्णालयात स्टेमी प्रकल्पांतर्गत १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश
अतिशय अद्ययावत असलेल्या या विभागाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मूत्ररोगशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी डॉ. अपर्णा हेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अपर्णा हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच या विभागात शिकणारे विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा पुरविण्यावर कामा रुग्णालय प्रशासाचा भर असणार आहे. मूत्ररोगशास्त्र विभागाचे बाह्यरुग्ण विभाग सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत खुले असणार आहे, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. मूत्रशास्त्रविभागातील विद्यार्थ्यांना दोन वर्षांची फेलोशीप
हे ही वाचा…वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर
कामा रुग्णालयात सुरू होणाऱ्या अद्ययावत मूत्रशास्त्र विभागाचा रुग्णांना, तसेच रुग्णालयामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या डॉक्टरांनाही याचा लाभ होणार आहे. या विभागात शिक्षणासाठी येणाऱ्या रुग्णांना दोन वर्ष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांचा शिक्षणाचा खर्चही कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.