मुंबई : खार येथील एका व्यावसायिकाची ६७ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल्स कंपाऊंडचे मालक व बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी (६०) यांना अटक केली आहे. आमीकृपा लँड डेव्हलपर्स ही रिअल इस्टेट कंपनी असलेल्या गोवानी यांनी तक्रारदाराकडून सांताक्रूझ येथे २२०४ चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला होता आणि त्याबदल्यात १० सदनिका आणि दुकान देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आपले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि सदनिका इतर व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. गोवानी यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कथित फसवणूक सप्टेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ दरम्यान घडली. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला आणि वरळी येथील रहिवासी असलेल्या गोवानी यांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तक्रारीनुसार, २०१३ मध्ये गोवानी यांनी तक्रारदार सुरजीत सिंह अरोरा यांच्याकडून सांताक्रूझ (पश्चिम) येथे २२०४ चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला होता. त्यांनी जमिनीच्या बदल्यात २० कोटी रुपये आणि १० सदनिका आणि दुकान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या कंपनीने भूखंडावर बांधलेल्या निवासी इमारतीमध्ये या सदनिका होत्या. गोवानी यांच्या कंपनीने या जमिनीवर एक इमारत बांधली परंतु दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. दहापैकी सात सदनिका इतर व्यक्तीला विकल्या. अशा प्रकारे तक्रारदाराची ६७ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : मुंबई आणि उपनगरांत मध्यम पावसाचा इशारा

अरोरा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. याप्रकरणात गुन्हा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गोवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोवानी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) ४०६(गुन्हेगारी विश्वासभंग), आणि ४०९ (सार्वजनिक सेवक, किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी उल्लंघन) आरोप ठेवण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala mills owner ramesh gowani arrested in fraud case by mumbai police mumbai print news css