मुंबई : निसर्गातील अद्भूत ठेव्यांचा पर्यटनदृष्ट्या अधिक विकास होत असून आता गोराई खाडीतील कांदळवन उद्यान लवकरच पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लवकरच भरती-ओहोटीच्या खेळात कांदळवनाची सफर पर्यटकांना करता येणार आहे.सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘गोराई कांदळवन उद्याना’ चे लोकार्पण मे किंवा जून महिन्यात करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. कांदळवन उन्नत मार्ग (बोर्ड वॉक) हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असून उद्यान गोराई खाडीत उभारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून या कांदळवन उद्यानात पर्यटकांना सुमारे ७०० मीटर मार्गावरून थेट कांदळवनाची सफर घडणार आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित होत आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून तेथे समृद्ध कांदळवने दिसतात. तेथे निसर्ग पर्यटन केंद्र व कांदळवन उन्नत मार्ग हे मुख्य आकर्षण आहे.

७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग

सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईमध्ये उन्नत मार्ग तयार केला आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसेच या मार्गात जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ आहेत. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. गोराई कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून मे किंवा जून महिन्यात या उद्यानाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

बोर्डवॉकवरून कांदळवन न्याहाळता येणार

लाकडाचा वापर करून बोर्डवॉक तयार करण्यात आला आहे. या बोर्डवॉकवरून पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची संरचना तयार केली आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार केली असून उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनाचे मानवाला होणारे फायदे समजणार आहेत. त्याचबरोबर कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते ? याची माहितीही मिळू शकणार आहे. लांबी ७०० मीटर आठ हेक्टर क्षेत्रावर विस्तार २६.९७ कोटी रुपये खर्च