सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील दिग्दर्शन करीत असलेल्या ‘रज्जो’ या चित्रपटाचे जवळपास ४० टक्के चित्रीकरण झाले आहे. एका वेश्येचा प्रवास या चित्रपटामध्ये मांडण्यात आला असून पटकथेमध्ये उत्तरोत्तर अनेक बदल करण्यात आल्याने आता कंगना राणावत हिचाही नव्याने चित्रपटात प्रवेश झाला असल्याची माहिती स्वत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
रज्जो या चित्रपटामध्ये तनुश्री चक्रवर्ती या बंगाली अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असूनही आता तनुश्रीऐवजी अभिनेत्री कंगना राणावतला चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासाठी पाचारण करण्यात आल्याची चर्चा केली जात होती. परंतु, या चर्चेला पूर्णविराम देत दिग्दर्शक विश्वास पाटील यांनी सांगितले की, पटकथेमध्ये बरेच बदल करण्यात आल्याने आतापर्यंत झालेले चित्रीकरण आणि आणखी नंतर केले जाणारे चित्रीकरण असे मिळून ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटाच्या दोन भागांप्रमाणे ‘रज्जो’ चित्रपटाचेही सलग दोन भाग करता येऊ शकतात. परंतु, अद्याप बरेच चित्रीकरण व्हायचे असल्यामुळे आताच काही निश्चित सांगणे शक्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.
रज्जो नावाच्या एका वेश्येचा प्रवास शास्त्रीय नृत्य कलावंतापर्यंत होतो हा या चित्रपटाचा विषय असल्याची माहिती माहिती पाटील यांनी दिली. अनेक अभिनेत्रींचा विचार यातील प्रमुख भूमिकेसाठी करण्यात येत होता. चित्रपटाचा काही भाग चित्रितही झाला आहे. परंतु, पटकथेमध्ये नंतर अनेक बदल करण्यात आल्याने आता कंगना राणावतचा प्रवेश चित्रपटात झाला आहे, असेही पाटील म्हणाले.
या चित्रपटात दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर हिजडय़ाच्या व्यक्तिरेखेत दिसणार असून ‘सिंघम’फेम अभिनेता प्रकाश राज, दलीप ताहील, जया प्रदा आणि स्वाती चिटणीसही या चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader