मुंबईतील पहिल्या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी
स्थानिक प्रश्न तसेच स्थानिक परंपरांची जाण ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने शनिवारी मुंबईतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींना मुंबईत बुलेट ट्रेन सुरू करायची आहे, पण उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवणार का, असा सवाल त्याने केला. ज्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकले गेले त्या पुण्यात माझ्यावरही शेणाचे गोळे फेकण्याचा इशारा दिला जात आहे, असा टोला हाणत पुण्यात जायचा निर्धार त्याने व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीला संत तुकाराम, ज्योतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांचे त्याने स्मरण केले.
नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात, आम्ही देशातील मागासलेल्या जनतेच्या आत्मसन्मानाविषयी बोलतो. आम्ही बोलतो तेव्हा त्यांना राष्ट्रवादाची आठवण होते, असे तो म्हणाला. डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे लावता, पण ब्राह्मण्यवाद आणि जातीयवादाला त्यांचा असलेला विरोध तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल त्याने केला.
वास्को द गामा बनून मोदी जगभर फिरले, पण त्यांना भारत सापडला नाही, असा टोला त्याने हाणला. सध्या दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाडय़ात ते आले नाहीत. देशभरातील २५ टक्के भाग दुष्काळात होरपळत आहे. खरे तर दुष्काळाला राष्ट्रीय महासंकट घोषित करायला हवे, अशी मागणी कन्हैया कुमार याने यावेळी केली. उजव्या विचारसरणीकडून मांडण्यात येणारा राष्ट्रवाद हा घटनाविरोधीच नव्हे तर हिंदू तत्त्वज्ञानाच्याही विरोधी आहे, असे अॅड. इरफान इंजिनिअर म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, व नाटकार जयंत पवार यांनीही देशातील सद्यपरिस्थितीवर आपले विचार मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा