कार्यक्रम वरळीऐवजी टिळकनगरच्या आदर्श विद्यालयात; कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मुंबईतील कार्यक्रमाचा मार्ग अखेर शुक्रवारी रात्री मोकळा झाला. वरळी येथील नियोजित ठिकाणी आयोजक शाळेने ऐनवेळी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने हा कार्यक्रम होणार किंवा नाही यावर प्रश्न उभा राहिला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडून शनिवारी टिळकनगरच्या आदर्श विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली.
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमार याच्यासह तीन विद्यार्थी आणि आनंद पटवर्धन, डॉ. राम पुनियानी, तिस्ता सेटलवाड यांचे व्याख्यान डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांच्या संघटनांनी ठेवले आहे. हा कार्यक्रम याआधी वरळी गावातील जनता शिक्षण संस्थेत होणार होता. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला २४ अटी घातल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या बैठकीत दोन उभे गट पडले. कन्हैयाच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि काही अनुचित प्रकार घडला तर नाहक संस्थेचे नाव बदनाम होईल, भीतीने ही परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, वरळीत होणारा हा कार्यक्रम होऊ नये यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी समाजमाध्यमांवरुन पोलिसांना दूरध्वनी करुन परवानगी देऊ नये यासाठी दबाव तयार करण्याचे संदेश फिरु लागले. दादर पोलिसांना फोन करुन कार्यक्रम होऊ देऊ नका, असे संदेश पसरवले जात होते. शुक्रवारी दुपारी मुंबई पोलीस जाणूनबुजून संघटनांचा आवाज दाबत असून राजकारण्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप कार्यक्रमाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला. समाजमाध्यमांतूनही हाच सूर आळवला जात असताना, प्रथमच मुंबई पोलिसांनी याविषयी स्पष्टीकरण दिले. आवश्यक त्या परवानग्या दिल्या की पोलिसांकडून कार्यक्रमांना संरक्षण पुरविण्यात येते. या कार्यक्रमाला पोलिस जाणीवपूर्वक परवानगी नाकारत असल्याच्या आरोपाचे पोलिसांनी खंडन
केले. कार्यक्रमाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमाला विरोध करण्याचे जाहीर केल्याने खबरदारी घेतली जात आहे.
भाषणासाठी अनेक अटी
वरळीतील ठिकाण रद्द झाल्यानंतर संघटनांनी टिळक नगर येथील आदर्श विद्यालय हे कार्यक्रमाचे ठिकाण निवडले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र, ध्वनिक्षेपकाची परवानगी घेतल्यानंतर, शुक्रवारी रात्री परिमंडळ ६ चे उपायुक्तांकडून कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली. शनिवारी दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला ध्वनिप्रदूषणाची मर्यादा सांभाळण्याबरोबरच देशविरोधी वक्तव्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल असे कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.