मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो ६ मार्गिकेचे कारशेड कंजूरमार्गमधील कारशेडच्या कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (५ मार्च) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) बैठक पार पडणार असून यात कारशेडच्या बांधकामाच्या निविदेला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वर्सोवा-विरार-पालघर सागरी सेतूचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्तीसाठीच्या निविदेलाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीएकडून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना मेट्रोने जोडण्यासाठी १५.३१ किमीच्या मेट्रो ६ मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या आणि ६६७२ कोटी खर्चाच्या या मार्गिकेमुळे लोखंडवाला येथून विक्रोळीला काही मिनिटात पोहचणे शक्य होणार आहे. या मार्गिकेसाठीचे कारशेड कांजुरमार्ग येथे बांधण्यात येणार असून या कारशेडच्या कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने कारशेडच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार सॅम इंडिया बिल्टवेल आणि अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी आर्थिक निविदा सादर केल्या आहेत. यात सॅम इंडिया बिल्टवेलने सर्वात कमी ५४७ कोटी रुपयांची बोली लावली आहे. तर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडने ६०८ कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे सॅम इंडिया बिल्टवेलला कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली.
हेही वाचा – पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू
निविदा अंतिम झाल्यास अनेक वर्षे रखडलेल्या कांजुरमार्ग कारशेडच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. मेट्रो ६ मार्गिकेचे काम २०२५ मध्ये पूर्ण करत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएने नियोजन आहे. त्यामुळे कारशेडच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. याअनुषंगाने बांधकामाचे कंत्राट अंतिम करत जूनपर्यंत बांधकामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. कांजूरमार्ग कारशेडच्या बांधकामाच्या निविदेसह वर्सेवा-विरार-पालघर सागरी सेतूचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची निुयक्ती करण्यासंबंधीचा प्रस्तावही प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. आर्वी असोसिएट आणि निप्पॉन कोई, जपान अशा दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. तेव्हा यात कोण बाजी मारते हे मंगळवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.