मुंबई : कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून काही बांधकाम व्यावसायिक नियमांना हरताळ फासून रात्रीही बांधकाम करीत आहेत. कांजूरमार्ग परिसरातील रहिवाशांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ बांधकाम बंद करण्यात आले. मात्र, बांधकामस्थळी ठेवण्यात आलेले सिमेंट, मातीच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात धूळ पसरत आहे. यामुळे रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
कांजूरमार्ग पूर्व परिसरातील आर्केड अर्थ कॉम्प्लेक्समधील रहिवाशांना गेले अनेक दिवसांपासून जवळच सुरू असलेल्या बांधकामामुळे आणि रेडीमिक्स सिमेंट प्लांटमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी पालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेने तात्काळ हे बांधकाम बंद केले. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट, मातीचे ढिगारे असून त्याबाबत योग्य काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे.
मागील दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत. मुंबईतील वायू प्रदूषण मुख्यत: बांधकामामुळे होते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणते नियम पाळावे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे महापालिकेने गेल्यावर्षीच जाहीर केली होती. तसेच मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांनीही प्रयत्न करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मात्र, तरीदेखील अनेक बांधकामांच्या ठिकाणी यांचे पालन होत नाही.
दरम्यान, काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारला आहे. अनेक भागात समाधानकारक हवेची नोंद होत आहे. डिसेंबर महिन्यात अनेकदा हवेचा दर्जा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदला गेला. मागील दोन महिन्यांत धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादायक पातळी ओलाडल्यामुळे या कालावधीत अनेकांना श्वसन विकारांच्या आजारांना सामोरे जावे लागले होते. गेल्या काही दिवसांपासून ज्या परिसरात याआधी ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत हवा नोंदली जात होती. त्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत बरीच सुधारणा झाली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील पथकाने १ जानेवारी रोजी पाहणी केली असता वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने संबंधित व्यावसायिकाला नोटीस बजावली होती.
नियमांचे पालन न केल्यास बांधकामांना पालिका, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नोटीस बजावण्यात येते. त्यानंतर काही कालावधीसाठी बांधकाम व्यावसायिक काम बंद करतात. मात्र, पुन्हा काही दिवसांनी तेच सत्र सुरू होते. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. – स्टॅलिन डी, स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. महापालिकेच्या प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तात्काळ बांधकामावर कारवाई केली जाईल. – भास्कर कसगीकर, सहाय्यक आयुक्त, एस विभाग कार्यालय