केंद्रातील मोदी सरकारला २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीला विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. पण, या बैठकीत रूसवे, फुगवे असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे. त्यावेळी अचानक पूर्वपदीचे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले. कपिल सिब्बल यांना अधिकृतरित्या निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. अशातच फोटोसेशनला कपिल सिब्बल यांची उपस्थिती काही काँग्रेस नेत्यांना रूचली नाही.

हेही वाचा : इंडियाच्या मानचिन्हावर सहमती नाही?

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. फोटोसेशनमध्ये सहभागी होण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी अचानक घेतलेला सहभाग काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांना पटला नाही. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरेंकडे याची तक्रार केली. पण, फारूख अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी वेणुगोपाल यांची समजूत काढली. राहुल गांधी यांनीही मला कोणावर आक्षेप नसल्याचं सांगितलं. नंतर सिब्बल यांना बैठकीत आणि फोटोसेशनमध्ये सहभागी करून घेण्यात आलं.

हेही वाचा : भाजपच्या खेळीने ‘इंडिया’ बैठकीचा नूरच पालटला

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी मे २०२२ मध्ये काँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. कपिल सिब्बल यांचा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये समावेश होता. यूपीए सरकारच्या कार्यकाळात कपिल सिब्बल वेगवेगळ्या मंत्रीपदावर राहिले होते. पण, काँग्रेस नेतृत्वावर बऱ्याच काळापासून सिब्बल नाराज होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sibal attend india meeting mumbai kc venugopal complaint uddhav thackeray ssa