‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटाच्या प्रदर्शनातून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवूनही त्याबाबतची माहिती उघड न केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटिशीविरोधात प्रसिद्ध निर्माता करण जोहर याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
करणच्या याचिकेनुसार, २० मार्च २०१२ रोजी सहाय्यक प्राप्तिकर आयुक्तांनी नोटीस बजावून २००६-०७ या वर्षांतील मालमत्तेची माहिती देण्याचे आदेश दिले होते. या नोटिशीत ‘कभी अलविदा..’च्या प्रदर्शनातून नफा म्हणून मिळालेल्या दोन कोटी रुपयांचा समावेश नसल्याचे म्हटले होते. करणने २००६-०७ या आर्थिक वर्षांत १४.७३ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले होते. त्यात चित्रपटांद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश होता. परंतु २००६-०७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा देताना त्यात करणने ‘कभी अलविदा..’च्या नफ्याचा उल्लेख केला नव्हता, असे प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीत म्हटले होते. हा सिनेमा ५७.४४ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता आणि त्याने ७०.१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मात्र असे असतानाही करणने फिल्मच्या निर्मितीवर नेमका किती खर्च केला याची पूर्ण माहिती दिली नसल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले होते.
आपण दिलेली माहिती चुकीची आहे, असे मानण्याचा सहाय्यक प्राप्तिकर अधिकाऱ्याला काहीही अधिकार नसून आपल्याला बजावण्यात आलेली नोटीस बेकायदा असल्याचा दावा करणने याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर करणच्या याचिकेवर ६ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा