आरोपी करंजुले याने गतिमंद मुलींसाठी आश्रमशाळा सुरू करून देणगीदारांच्या मनात सत्कार्य करीत असल्याचा भ्रम निर्माण केला, असे निरीक्षण पनवेल-कळंबोली येथील ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्था’ या आश्रमशाळेतील वासनाकांडाबाबतच्या  निकालात न्यायालयाने नोंदविले.
सत्कार्य करण्याचा भ्रम निर्माण करणाऱ्या या नराधमांनी प्रत्यक्षात मात्र अन्य आरोपींच्या साथीने या मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे जीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. शिवाय आश्रमशाळा सुरू करून घेतलेल्या पालकत्वाच्या नात्याचाही त्याने या मुलींवर बलात्कार करून गळा घोटला. त्याच्या या घृणास्पद कृत्याबाबत कुणालाही काही सुगावा लागू नये म्हणून करंजुले याने आश्रमातील १९ मुलींना गुरांप्रमाणे अक्षरश: २५० चौरसफुटाच्या खोलीत डांबून ठेवले होते. त्यांना मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध करून देणे तर दूर साध्या मूलभूत सुविधाही त्यांना दिल्या जात नव्हत्या. एवढेच नव्हे, तर त्याने केवळ स्वत:चीच वासना भागविण्यासाठी या मुलींवर बलात्कार केला नाही, तर आपल्या मित्रांच्या साथीने त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. १९ पैकी तीन पीडित मुलींनी न्यायालयात साक्ष देऊन लोकांच्या दृष्टीने ‘देव’ असलेल्या करंजुलेचा पर्दाफाश केला. करंजुले हा एका मुलीवर लैंगिक अत्याचार, बलात्कार करून तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला.
दरम्यान, करंजुले याच्यासह त्याची पत्नी, मुलीसह आणखी तीनजणांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. तर शिर्डी येथे अशाचप्रकारची आश्रमशाळा चालविणारा प्रकरणातील सहआरोपी खंडु कसबे आणि आश्रमशाळेतील शिक्षक प्रकाश खडके यांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली. याशिवाय नानाभाऊ करंजुले या आणखी एका आरोपीला न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Story img Loader