कर्जत एमआयडीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपा आमदार राम शिंदे यांच्यात जुंपली आहे. गुरुवारी ( २८ जुलै ) राम शिंदे यांनी कर्जत एमआयडीसीसाठी हस्तांतरित करण्यात येणारी जागा नीरव मोदीची असल्याचा दावा केला होता. पण, हा दावा रोहित पवार यांनी फेटाळला आहे. नीरव मोदीची जागा एमआयडीसीने वगळली आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, “राम शिंदे यांनी चुकीची माहिती विधानपरिषेदत दिली. मात्र, राम शिंदेंना मला सांगायचं की, ही जमीन नीरव मोदीची आहे. पण, नीरव मोदीच्या नावाचे एक कंपनी आहे. त्यात नीरव मोदीचे मित्रही भागीदार आहेत. ८३ एकरची ही जागा आहे. ही जागा एमआयडीसीने वगळली आहे.”
“कारण, ही जमीन ईडीच्या ताब्यात आहे. नीरव मोदीने २०११ ते २०१४ कार्यकाळात या जमीन विकत घेतल्या आहेत. मग, या जमीन घेताना कोणी मदत केली? याची शहानिशा सरकारने केली पाहिजे. तेव्हा तिथे राम शिंदे लोकप्रतिनिधी होते. याबाबत ईडीनेही लक्ष देण्याची गरज आहे,” असेही रोहित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : “संभाजी भिडेंचा बंदोबस्त करावा अन्…”, बाळासाहेब थोरात यांची सरकारकडे मागणी
राम शिंदे काय म्हणाले होते?
“कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमीन कवडीमोड दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. त्यांची नावे नीरव मोदी, मनिषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. मग, ही एमआयडीसी गुंतवणूकदार, शेतकरी की बेरोजगारांसाठी करायची?” असा प्रश्न राम शिंदे यांनी विधानपरिषेदत उपस्थित केला होता.