बॉलिवूड कलाकार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नवा आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत समीर वानखेडे आणि मोहित कंम्बोज यांच्यावर आरोप केले. आर्यन खानचे प्रकरण अपहरण आणि खंडणीचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कंबोज आणि वानखेडेंचे संबंध असल्याचेही सांगितले. याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानने पुढे येऊन बोलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर आता क्रूझवरील ड्रग्ज पार्टीसाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यालाही बोलवले होते असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीत सहभागी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख (Aslam यांनाही आग्रह करण्यात आला होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याचा हा डाव होता, असा आरोप मलिक यांनी केला.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग पार्टीत मोठ्या घरातील लोकांना त्यात अडकवून समीर वानखेडे यांच्या प्राइव्हेट आर्मीला वसुली करायची होती. राज्य सरकारच्या आशीर्वादाने अशा ड्रग्ज पार्ट्या सुरू असल्याचेही भासवण्याचा कट होता, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला.

“कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचे आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान याने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील पार्टीचं आमंत्रण दिलं होते. शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता. राज्यातील मंत्र्यांच्या मुलांना फसवून त्या पार्टीत नेण्याचा प्रयत्न करत होता. या काशिफ खानला एनसीबीनं का पकडलं नाही? अस्लम शेख यांना तो तिथं का बोलवत होता? मंत्र्यांच्या मुलांना तो का ट्रॅप करत होता? ड्रग्जचा खेळ राज्य सरकार चालवतंय असं तर यांना दाखवायचं नव्हतं ना?,” असा सवाल मलिक यांनी केला आहे.

“अस्लम शेख यांना खूप आग्रह केला जात होता, ते स्वत: याबद्दल सांगतील. पण ते या पार्टीत गेले नाहीत, ते गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र असा खेळ झाला असता असे,” मलिक म्हणाले.

Story img Loader