शिवसेनेचा विरोध असतानाही मुंबई पोलीसांनी पुरविलेल्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी निर्विघ्नपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी नेहरू सेंटर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी सुरक्षाव्यवस्था पुरविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
खुर्शिद कसुरी यांनी लिहिलेल्या ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने मुंबईत प्रकाशन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेने पहिल्यापासून तीव्र विरोध केला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी हा ‘शाईहल्ला’ केला. शिवसेनेने या कृतीचे समर्थन करतानाच सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप केला. या सर्व घटना घडत असतानाच प्रकाशनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार, यावर सुधींद्र कुलकर्णी ठाम होते. तर त्याचवेळी या कार्यक्रमाला विरोध करण्यावरही शिवसेना ठाम होती. त्यामुळे दुपारपासूनच नेहरू सेंटर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुर्शिद कसुरी आणि सुधींद्र कुलकर्णी या दोघांनाही पोलीसांनी सुरक्षा पुरविली होती.
संध्याकाळी सहानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, मुंबई जशी महाराष्ट्राची आहे. त्याचप्रमाणे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शहरही आहे. हे लोकशाहीवादी शहर असून, मला मुंबईबद्दल त्याचबरोबर मराठी असल्याबद्दल अभिमान आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी ना गोली से, ना बंदूक से, बात बनेगी बोली से, हाच मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सुरक्षा पुरविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्याचे जाहीर आभार मानले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा