डोंबिवली पश्चिमेतील अनधिकृत बांधकामांचा वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रशासनाने पुन्हा शनिवारी सुरू केली. नवापाडा, सरोवरनगर, गणेशनगर, कुंभारखाणपाडा भागातील अनधिकृत इमारती, चाळींचा वीज, पाणीपुरवठा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तोडून टाकला. यावेळी या बांधकामांमधील महिलांनी आक्रोश करीत अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवली पश्चिमेतील २४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे शासनाचे आदेश असल्याने पहिल्या टप्प्यात या इमारतींचा वीज, पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी, प्रथम या बांधकामांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करा, मगच या बांधकामांवर कारवाई करा अशी भूमिका घेतली आहे. प्रशासनाने शनिवारी पोलीस फौजफाटा घेऊन मोर्चातील लोकप्रतिनिधींच्या आव्हानांचा विचार न करता नवापाडामधील शांताराम सदन, भगवान काटे निवास, शिवशक्ती कृपा, साई सुखदेव चाळ अशा एकूण १५ अनधिकृत बांधकामे व चाळींचा वीज, पाणीपुरवठा खंडित केला. या कारवाईच्या वेळी महिलांनी पालिका अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावेळी पालिका अधिकारी लहू वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.