मुंबई : मंगळागौरीच्या पारंपरिक खेळाचे सूत्र घेऊन स्त्रीच्या भावविश्वात डोकावणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाने अतुलनीय यश मिळवले. प्रेक्षकपसंती आणि आर्थिक कमाई दोन्ही बाबतीत वरचढ ठरलेल्या या चित्रपटानंतर केदार शिंदे यांनी त्यांच्या ‘आईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आईपण या महत्त्वाच्या नाजूक विषयावर हा चित्रपट करणार असल्याचे केदार शिंदे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने मराठीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आणि गेल्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रमी कामगिरी केली. प्रदर्शित झाल्यापासून पन्नास दिवसांत ९२ कोटींची कमाई या चित्रपटाने केली. ‘अगदी पहिल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात स्त्रीच्या मनात काय चालते याचा शोध घेतला, बाईपणने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. या यशाने जबाबदारी वाढली आहे’ असे सांगत नव्या चित्रपटातून आईपण निभावणाऱ्या स्त्रीच्या भावभावनांची मांडणी करणार असल्याचे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटासाठीही केदार शिंदे यांनी जिओ स्टुडिओजशी करार केला आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या लेखिका वैशाली नाईक यांच्याबरोबर ओमकार मंगेश दत्त, तसेच निर्माती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे हे सहनिर्माते हाच चमू ‘आईपण भारी देवा’साठी एकत्र आला आहे.
हेही वाचा… ‘वेड’ फेम शुभंकर तावडेने नेपोटिझमबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला “मराठी इंडस्ट्रीत…”
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने खूप काही शिकवले. खरेतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते, पण बाईपण… हा चित्रपट करताना आणि नंतर तो प्रदर्शित झाल्यावर रसिकांचा जो प्रतिसाद मिळाला त्याने भारावून गेलो होतो, अशी भावना केदार शिंदे यांनी व्यक्त केली. आता या विक्रमी यशानंतर केदार शिंदे यांनी नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली असून ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटातील कलाकार कोण असतील? चित्रीकरण आदी तपशील हळूहळू कळणार आहेत.