मराठी दिग्दर्शक केदार शिंदे राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे ट्वीट्स कायमच चर्चेत राहतात. आता केदार शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची घोषणा आणि अचानक उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावर ट्वीट करत टोला लगावला. या ट्विटमध्ये त्यांनी अण्णा जेवायला जेवायला असं म्हणत ‘सही’ आणि ‘उपोषण’ असे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

“पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून…”

दरम्यान, याआधी केदार शिंदे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतरही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल अशी उपहासात्मक टीका केली होती.

“वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले होते.

वाइन निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषण स्थगित

किराणा दुकानातून वाइन विक्री करणार नाही तसेच वाइन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून (१४ फेब्रुवारी) सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे आज, रविवारी दुपारी झालेल्या ग्रामसभेत हजारे यांनी हा निर्णय जाहीर केला. कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार  उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर तसेच सहआयुक्त, उपायुक्त, नगरचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी अडीच तास चर्चा केली.

हेही वाचा : मोठी बातमी! वाइन निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषण करणार नाहीत

या चर्चेत किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही, वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल, वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागवण्यात येतील, जनतेच्या सूचना व हरकती मागवण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यात येईल, नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ठरले.

अशा प्रकारची  धोरणे  जनतेला विचारून ठरवावीत, असा आग्रह आपण शासनाकडे धरला  व तो शासनाने मान्य केल्याचे लेखी पत्र प्रधान सचिवांनी दिले.  आपण त्यावर विश्वास ठेवला. त्याचे पालन झाले नाहीतर पुन्हा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही हजारे म्हणाले.