ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्याचे संग्रहालयात रुपांतर करण्याची आमचीही इच्छा असल्याचे सोमवारी अणुऊर्जा विभागातर्फे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने त्यांना हस्तक्षेप याचिका करण्यास परवानगी देत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे.
डॉ. भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव न करता त्याला हेरिटेज दर्जा द्यावा अथवा त्याचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रुपांतर करावे, या मागणीसाठी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील कर्मचारी संघटनांनी जनहित याचिका केली आहे. अणुऊर्जा विभागाने सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस आपले याचिकेला समर्थन असल्याचे न्यायालयाला कळविले व हस्तक्षेप याचिका करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. जी न्यायालयाने मान्य केली.
दरम्यान, कमला नेहरू पार्क (हँगिंग गार्डन) शेजारीच भाभा यांचा बंगला आहे. या बंगल्याचा लिलाव १८ जून रोजी करण्याचा निर्णय जागेचा ताबा असणाऱ्या ‘एनसीपीए’ने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी त्याची प्राथमिक किंमतही ठरविलेली आहे. मात्र १७ हजार १५० चौरस फुटांवरील या बंगल्याचा लिलाव न करता त्याला हेरिटेज दर्जा द्यावा अन्यथा त्याचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रुपांतर करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या बंगल्यात भाभा यांनी विविध ठिकाणांहून आणलेल्या कलात्मक वस्तूंचा ठेवा आहे. शिवाय भाभा याच बंगल्यातून आपले कामही करीत होते. त्यामुळे या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक वा हेरिटेजचा दर्जा दिला तर लोकांसाठी विशेष करून विज्ञान क्षेत्राकडे वळू पाहणाऱ्यांसाठी ती प्रेरक बाब असेल, असेही याचिकेत म्हटले आहे.

Story img Loader