मुंबई क्रिकेट मंडळाच्या कांदिवली क्लबला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या(एएपी) कार्यकर्त्यांनी सचिन तेंडुलकरचे घर गाठले. सचिन तेंडुलकरला पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आले असून, त्यामध्ये सचिनने ‘एमसीए’च्या कांदीवली क्लबच्या प्रस्तावापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
“सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूने घोटाळ्यांमधून उभ्या राहीलेल्या एमसीएच्या कांदीवली क्लबसोबत संबंध ठेवल्यामुळे ‘एएपी’मध्ये नाराजी आहे. एएपीच्या महाराष्ट्र समन्वयक अंजली दमाणीया यांचे पत्र घेवून ‘एएपी’चे कार्यकर्ते सचिन तेंडुलकरच्या घरी गेले. सचिनला पत्राव्दारे या निर्लज्ज संस्थेसोबत संबंध ठेऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे,” असे ‘एएपी’ने प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
तू देशाचा ख्यातकिर्त व्यक्ती आहेस. प्रत्येक भारतीयाचे हृदय तुझ्यासाठी धडकते. तू आमच्यासाठी प्रेरणास्थळ असून, देशासाठी तू अभिमान आहेस. तुझे नाव ‘एमसीए’च्या कांदीवली क्लबसोबत जोडले गेल्याचे कळल्यावर आम्हा सर्वांना वाईट वाटले आहे. कांदीवली क्लब हे राजकारण्यांच्या राष्ट्रीय स्त्रोतांच्या लुटीचे मुर्तीमंत उदाहरण आहे. एखाद्याकडे उरलेल्या थोड्या फार अपेक्षा देखील लुटल्याजाण्याचे उदाहरण कांदीवली क्लब आहे. अशा या भ्रष्ट क्लबसोबत तुझे नाव जोडणे म्हणजे देशामध्ये थोडी फार शिल्लक राहिलेली आशा संपवल्या सारखेच आहे.
“मुंबईच्या लहान मुलांच्या खेळाचे मैदान लुबाडून त्या ठिकाणी श्रीमंताच्या ऐय्याशीसाठी बांधण्यात आलेल्या कांदीवली क्लबला तुझे नाव देण्यास तू स्वत: विरोध करावा अशी विनंती आम्ही ‘एएपी’च्या वतीने करतो,” असे दमाणीया यांनी पत्रात लिहीले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
‘एएपी’ने कांदीवली क्लब विरोधामध्ये न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे.
सचिनने ‘कांदिवली क्लब’शी संबंध ठेऊ नयेत!- आम आदमी पक्ष
मुंबई क्रिकेट मंडळाच्या कांदिवली क्लबला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या(एएपी) कार्यकर्त्यांनी सचिन तेंडुलकरचे घर गाठले.
![सचिनने ‘कांदिवली क्लब’शी संबंध ठेऊ नयेत!- आम आदमी पक्ष](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/lok0461.jpg?w=1024)
First published on: 25-10-2013 at 12:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwals aap writes to sachin asks him not to associate with mcas kandivali club