मुंबई : चार वर्षांपासून गळ्याखाली वाढत असलेल्या गाठीमुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून केईएम रुग्णालयालातील डॉक्टरांनी दिलासा दिला. अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर ही व्यक्ती केईएम रुग्णालयात दाखल झाली होती. या व्यक्तीच्या गळ्याखालून ३० सेंटीमीटर इतकी मोठी गाठ काढण्यात आली.

टिटवाळा येथे राहणारे निखिल पालशेतकर यांच्या गळ्याखाली मोठी गाठ तयार झाली होती. या गाठीमुळे त्यांना मागील चार वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्यांना व्यवस्थित झोपताही येत नव्हते. या गाठीमुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. यावर उपचार करण्यासाठी निखिल पालशेतकर अनेक रुग्णालयांत गेले. मात्र या गाठीचा आकार प्रचंड असल्याने सर्वच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. अखेर निखिल पालशेतकर केईएम रुग्णालयाच्या कान – नाक – घसा विभागामध्ये उपचारासाठी आले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भूलतज्ज्ञ प्रा. डॉ. शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने कान – नाक – घसा विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. नीलम साठे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून निखिल पालशेतकर यांच्या गळ्याखालून साडेतीन किलो वजनाची गाठ काढली. या गाठीचा आकार ३० सेंटीमीटर इतका होता.

हेही वाचा…‘मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली’ बंद राहणार

पोटामध्ये आढळते मोठी गाठ

साडेतीन किलो वजनाची आणि ३० सेंटीमीटर इतकी मोठी गाठ ही साधारणपणे पोटामध्ये आढळते. अद्यापपर्यंत जगभरामध्ये गळ्याखालून इतकी मोठी गाठ काढलेली नाही, असे डॉ. नीलम साठे यांनी सांगितले.

Story img Loader