मुंबई : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात १६ नव्या खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून त्यापैकी आठ खाटा मज्जातंतू शस्त्रक्रिया (न्यूरोसर्जरी) विभागाला, तर आठ खाटा मज्जातंतू शरीरविज्ञानशास्त्र (न्यूरोफिजियोलॉजी) विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेफ्रोलॉजी विभागामधील रक्तशुद्धीकरण केंद्रातील खाटांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रक्तशुद्धीकरण करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. परिणामी, केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागामधील अपुऱ्या खाटांचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची अतिरिक्त बस सेवा
केईएम रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. मात्र रुग्णांच्या तुलनेत अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या अपुरी होती. ही बाब लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या मज्जातंतूशास्त्र विभागाच्या अतिदक्षता विभागामध्ये १६ नव्या खाटा उपलब्ध करण्यत आल्या आहेत. मज्जातंतूशास्त्र विभागातील रुग्णांना वैद्यकशास्त्र विभागाच्या अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात येत होते. मात्र आता मज्जातंतू विभागासाठी स्वतंत्र खाटा उपलब्ध करण्यात आल्याने वैद्यकशास्त्र विभागातील गंभीर रुग्णांना अतिदक्षता खाटा मिळण्यास मदत होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
हेही वाचा >>> नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण : पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न झालेल्या आरोपीला पकडण्यात यश
रक्तशुद्धीकरण केंद्रातील खाटांची संख्या २३ वर मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मूत्रपिंड निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही बाब लक्षात घेता केईएम रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरणासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अतिरिक्त आठ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केईएम रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्रातील खाटांची संख्या २३ इतकी झाली आहे. यापूर्वी या विभागात वर्षाला ८०० रुग्णांचे रक्तशुद्धीकरण करण्यात येत होते. मात्र या नव्या खाटांमुळे सुमारे १५०० रुग्णांचे रक्तशुद्धीकरण करणे शक्य होणार आहे.