मुंबई : केईएम रूग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात २२ ऑगस्टपासून ‘मॉड्युलर शस्त्रक्रियागृह’ सुरू करण्यात आले आहे. अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या माध्यमातून डोळ्यांशी संबंधित उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. केईएम रूग्णालयातील नेत्र विभागाचे माजी विभागप्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रूमी जहांगीर यांच्या हस्ते आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या उपस्थितीत मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
केईएम रूग्णालयात सुरू केलेल्या अद्ययावत मॉड्युलर शस्त्रक्रियागृहामुळे शस्त्रक्रियांची प्रक्रिया अधिक सुकर आणि वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. आतापर्यंत नेत्र शल्यचिकित्सा विभागात महिन्याला सरासरी २२० शस्त्रक्रिया पार पडत होत्या. अद्ययावत उपकरणामुळे आता महिन्याला ३०० शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, अशी माहिती नेत्र शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश इंगोले यांनी दिली.
केईएम रूग्णालयाच्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहामध्ये अद्ययावत उपकरणांसोबतच मॉड्युलर सेटिंग आणि लॅमिनर एअर फ्लो यासारख्या सुविधा आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी हाय स्पीड स्वरूपाची स्वयंचलित ऑटोक्लेव्ह संयंत्र देखील संयोग ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपकरणामुळे शस्त्रक्रियांची संख्या वाढतानाच रूग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी मदत होणार आहे. नेत्र विभागामध्ये मोतिबिंदू, ग्लाऊकोमा, स्क्विंट, रेटिना, कॉरेना, लहान मुलांशी संबंधित डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात.
© The Indian Express (P) Ltd