मुंबई : गुडघा, खांदा आणि कंबरदुखीसारखे आजार व्यक्तीला नेहमीच हैराण करतात. मात्र आता योग्य व्यवस्थापन करून वेदनांमधून रुग्णांची सुटका करण्यासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. यामुळे वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, बोट ट्रिगर, नागीण, मायग्रेन, ट्रायजेमिनल, इंटरस्टिशियल सिस्टिटिस किंवा कर्करोग उपचारामध्ये रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. विविध प्रकरणांमध्ये आजार बरा झालेला असतो, परंतु वेदना कायम असतात. अशा रुग्णांना वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी केईएम रुग्णालयात २०११ मध्ये भूल विभागाच्या माध्यमातून वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. हा विभाग भूल विभागाच्या प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या विभागाला १४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये ४५ ते ७० या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यात गुडघा दुखणे, पाठीचे आजार, खांदा दुखणे, पायाची नस खेचणे, पायाला मुंग्या येणे यांसारख्या आजाराने त्रस्त नागरिकांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा – bhandup school girls molested : भांडुपमधील खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात दरआठवड्याला साधारणपणे २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी १५ ते १६ रुग्णांना शस्त्रक्रियागृहामध्ये उपचार करण्याची आवश्यकता भासते. मात्र या विभागाचे स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याने डॉक्टरांना अन्य विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचा वापर करावा लागत होता. मात्र यासाठी त्यांना अन्य विभागाचे शस्त्रक्रियागृह रिक्त होण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या प्रयत्नाने वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करण्यात आले. अत्याधुनिक, संसर्गविरहित असलेल्या या शस्त्रक्रियागृहामध्ये फक्त वेदनांपासून मुक्त होण्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या शस्त्रक्रियगृहामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. या शस्त्रक्रियागृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याची माहिती भूल तज्ज्ञ आणि पेन फिजिशियन्स डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली.

वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागाचा विशेष फायदा महिलांना होणार असून सांधेदुखी, गुडघेदुखी, मानटुखी यासारख्या अनेक समस्यांनी महिला त्रस्त असतात. या वेदनांपासून सुटका करण्यासाठी वेदनाशामक गोळी घेतली जाते. पण त्याने फारसा फरक पडत नाही. केईएम रुग्णालयात वेदना व्यवस्थापन उपचार मोफत होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भूल तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. – डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

हेही वाचा – ND Studio : ‘एन डी’ स्टुडिओचा ताबा अखेर शासनाकडे

वेदनांमुळे तरुण त्रस्त

सध्या घरातून कार्यालयीन काम करण्याचे प्रमाण वाढले असून ३० ते ४० वयोगटातील नागरिकांमध्ये स्नायू दुखण्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. हा त्रास बराच काळ राहिल्यास त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. या वेदनांमुळे तरुणांमध्ये ताण निर्माण होऊन त्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो.

शस्त्रक्रियागृहात कसे होणार उपचार

शस्त्रक्रियागृहामध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या विभागांतर्गत शस्त्रक्रियागृहात उपचारासाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णांची सोनोग्राफी आणि क्ष किरणाद्वारे कोणती नस किंवा स्नायू दुखत आहे, याची तपासणी करून त्या भागामध्ये इंजेक्शन दिले जाते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kem hospital operates independent pain management surgery center mumbai print news ssb