लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये आजारांबाबत अनेक गैरसमज असतात. रुग्णांमधील आजारांविषयीचा गैससमज दूर करण्यासाठी केईएम रुग्णालयाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त १०० लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या लघुपटातून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आजारांबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तसेच समाजमाध्यमांवरही हे लघुपट प्रसारित करण्यात येणार आहेत.
केईएम रुग्णालयामध्ये मुंबई व मुंबईबाहेरून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारसाठी येतात. यापैकी अनेक रुग्ण आजाराबाबत अनभिज्ञ असतात किंवा अनेकांना त्याविषयी अर्धवट माहिती असते. त्यामुळे रुग्ण योग्य उपचार घेण्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य देतात. परिणामी, रुग्णांचा आजार अधिक बळावतो. रुग्णांचे अनुभव व डॉक्टरांमधील संवाद याच्या माध्यमातून आजारांची सविस्तर माहिती रुग्णांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. विभागनिहाय आजारावर किमान तीन ते चार लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केईएम रुग्णालयामधील ४८ विभाग लघुपटांची निर्मिती करणार आहेत. चित्रपट निर्मिती क्षेत्रातील व्हिसलिंग वूड या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे लघुपट बनविण्यात येणार आहेत.
केईएम रुग्णालयातर्फे निर्मिती करण्यत येणारे हे लघुपट रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाहता यावे यासाठी प्रत्येक बाह्यरुग्ण विभागाबाहेर दूरचित्रवाणी संचाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दूरचित्रवाणी संचावर सतत हे लघुपट प्रसारित केले जाणार आहेत. त्याचबरोबर बाह्यरुग्ण विभागाबाहेर स्कॅनरही लावण्यात येणार असून हे स्कॅनर स्कॅन केल्यावर रुग्णांना सदर लघुपट मोबाइलवरही पाहता येतील, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
देणगीच्या माध्यमातून दूरचित्रवाणी संच उपलब्ध
बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना हे लघुपट पाहता यावेत, यासाठी सर्व बाह्यरुग्ण विभागाबाहेर लावण्यात येणारे दूरचित्रवाणी संच दानशूर दात्याच्या सहकार्यातून उपलब्ध झाले आहेत. एका दात्याने रुग्णालयामध्ये दूरचित्रवाणी संच बसविण्यासाठी देणगी दिल्याची माहिती डॉ. संगीता रावत यांनी दिली.
विद्यार्थी साकारणार भूमिका
रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी निर्मिती करण्यात येणाऱ्या लघुपटामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व डॉक्टर भूमिका साकारणार आहेत. या लघुपटामध्ये रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यातील संवाद दाखविण्यात येणार आहे. या संवादातून संबंधित आजाराची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर उलगडून सांगणार आहेत. तसेच त्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहितीही दिली जाणार आहे. जेणेकरून रुग्ण बाह्यस्रोतांद्वारे मिळणाऱ्या अर्धवट माहितीच्या आधारे चुकीच्या उपचारांना बळी पडणार नाहीत, असे रावत यांनी सांगितले.