चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेत त्या कामावर रुजू झाल्या. मात्र या आंदोलनामुळे रुग्णांना फटका बसला.
चतुर्थश्रेणी कामगार विश्राम तेली याने अपशब्दांचा वापर केल्याची लेखी तक्रार परिचारिका सोनल खारवी यांनी १० दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. संध्या कामत यांच्याकडे केली होती. आपल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे सोनल खारवी संतप्त झाल्या होत्या. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी बुधवारी सकाळी ८ वाजता ठिय्या आंदोलन केले. विश्राम तेली यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात येत होती. मात्र रुग्णालयीन प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत असल्यामुळे परिचारिका आणखी संतप्त झाल्या. अखेर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी तेली याच्याविरुद्ध तक्रा दाखल करुन घेतली आणि परिचारिकांना सुरक्षिततेची हमी दिली. त्यानंतर परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले आणि त्या कामावर रुजू झाल्या.

Story img Loader