आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मॉन्ट ब्लॉकमधील रहिवाशांच्या मदतीसाठी सरसावलेले दोन अग्निशमन केंद्र अधिकारी आणि चार अग्निशामक भाजले. तर आगीवर पाण्याचा फवारा मारताना त्याची तोटी उडून डोक्यावर बसल्यामुळे एक अग्निशामक गंभीर जखमी झाला. भाजलेल्यांवर ऐरोलीमधील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर जखमी अग्निशामकाची प्रकृती स्थिर आहे.
विद्युतपुरवठा खंडीत केल्यामुळे अंधारात चाचपडत १२ व्या मजल्यावर पोहोचलेले अग्निशमन केंद्र अधिकारी एम. एम. देसाई, दांडे, अग्निशामनक संदीप, कमलाकर, सुनील अप्पा नाईक हे आगीत होरपळले. उपचारांसाठी त्यांना ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयाला भेट देऊन आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पालिकेच्या रुग्णालयात भाजलेल्यांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी नॅशनल बर्न हॉस्पिटलमधील डॉक्टरांबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, काही जखमींना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात प्रथमोपचारांती हलविण्यात आल्यामुळे त्यांच्यात नाराजी होती.

Story img Loader