मॉन्ट ब्लँक इमारतीच्या १२ व्या मजला आगीत भस्मसात झाला आणि त्यात चित्रपट निर्माते दिनेश गांधी, पत्नी देवयानी यांच्यासह सातजण मृत्युमुखी पडले. एरवी व्हीआयपी, उद्योगपती, बडे व्यापारी आदींच्या धावपळीत गजबजून जाणारा केम्प्स कॉर्नर परिसर या घटनेमुळे सुन्न झाला होता. प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी पुढे येण्यासही कोणी तयार नव्हते. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही मॉन्ट ब्लँक सोसायटीत प्रवेशबंदी केली गेली होती. मॉन्ट ब्लँक इमारतीच्या १२ व्या मजल्याला शुक्रवारी सायंकाळी ७.५० च्या सुमारास आग लागल्याचे वृत्त मुंबईत वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि अनेक मुंबईकरांचे डोळे वृत्तवाहिन्याकडे लागले. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्यास सुरुवात केली. जसजशी रात्र सरत होती, तसतशी भिती वाढत होती. १२ व्या मजल्यावर आग भडकल्याने १३-१४ व्या मजल्यावरील रहिवाशांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. रात्री ९.३० च्या क्राळविक्राळ रुप धारण केलेल्या आगीने संपूर्ण १२ वा मजल्याला वेढले. शेजारचे घरही आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री ११.१५ च्या सुमारास आग नियंत्रणात आणली. धुमसणारी आग मध्यरात्री १.११ च्या सुमारास शांत झाली. वरच्या मजल्यांवरील १४ जणांना सुखरुप खाली आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र आगीमुळे निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि धूरामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते.
आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर १२ व्या मजल्यावरील रहिवाशांची शोधाशोध सुरू झाली. या मजल्यावर चित्रपट निर्माते दिनेश गांधी राहात होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी गांधी कुटुंबियांची शोधाशोध सुरू केली. आगीत नामशेष झालेल्या घरातमधील एका खोलीत होरपळलेले तीन, तर १२ व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये दोन मृतहेद सापडले. आगीमुळे घाबरलेल्या १६ व्या आणि २६ व्या मजल्यावरील प्रत्येकी एक रहिवाशी घाबरुन पळण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु धुरामुळे घुसमटून त्यांचा मृत्यू झाला. एकूण सात जण या दुर्घटनेत दगावले. रात्री उशीरा नायर रुग्णालयात तिघांचे, तर जे.जे. रुग्णालयामध्ये चौघांचे मृतदेह पाठविण्यात आले. याची धग शनिवारीही जाणवत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा