देशांतर्गत पर्यटनाचा विचार करता सर्वाधिक पसंती केरळ आणि राजस्थान या दोन राज्यांना असल्याचे मधुचंदा ट्रॅव्हल्सतर्फे सांगण्यात आले. केरळ सरकारने पर्यटनावर दिलेला भर आणि डिसेंबर-जानेवारी महिन्यात राजस्थानमध्ये असलेली महोत्सवांची धूम यामुळे या दोन राज्यांना अधिक पसंती मिळते. केरळ पाहण्यासाठी सात ते आठ दिवस पुरेसे आहेत. तर संपूर्ण राजस्थान पालथा घालण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. या दोन्ही राज्यांची पॅकेजेस साधारण २५-३० हजार माणशी आहेत.
डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे जाणाऱ्यांची संख्या फार नसली, तरी दुर्लक्षित करण्यासारखीही नाही. या कालावधीत देशातील पर्यटकांच्या पाच ते दहा टक्के पर्यटक या दोन राज्यांमध्ये जात असल्याचे शैलेश पाटील म्हणाले. या पर्यटकांमध्ये तरुणांचा भरणा जास्त असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. या कालावधीत या दोन्ही राज्यांमध्ये बर्फ असल्याने बर्फावरील खेळ खेळण्यासाठी तरुणाई येथे गर्दी करते.
रुळलेल्या पर्यटनाशिवाय ऑफबिट पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा असल्याचे हार्मनी टूर्सच्या कौस्तुभ जोशी यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सहल, लोणार येथे आकाशदर्शनाची सहल, वाईन टूर, कोकण टूर ऑन बाईक, म्युझिक फेस्टिव्हल टूर अशा चाकोरीबाहेरच्या टूर्सनाही पर्यटकांचा प्रतिसाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जास्त संख्येने पर्यटक अशा टूर्सना येत नसले, तरी हळूहळू ऑफबिट पर्यटनाचा ट्रेंड भारतात सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांना रुळलेल्या जागांपेक्षा काही तरी अनवट करायला आवडते. आम्ही त्यांची हीच गरज भागवत असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader