महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्याबाबत बोलताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला करणाऱ्या कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फूस देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आज बेळगाव सीमाभागात ज्या प्रकारे महाराष्ट्रातील गाड्यांवर कन्नड वेदिकांनी हल्ला केला, त्याचा आम्ही निषेध करतो. या कन्नड वेदिकेच्या मागे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला काँग्रेस आणि जेडीएस हे दोन पक्ष आहेत. पुढच्या काळात काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.
काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात एक भूमिका मांडत आहे आणि कर्नाटकामध्ये कन्नड वेदिकेला मागून फूस देत आहेत. कन्नड वेदिकांच्या मागून कोण आंदोलन करते आहे? कोण खतपाणी घालते आहे? हे लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत महाविकास आघाडीनेही भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्च्यावरूनही टीका केली. हा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आज दुपारी बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यावेळी सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्याचा महाराष्ट्र सरकारकडून निषेध करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आपण एका देशात राहत असून, सीमावाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका घेतली पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जे उकसवायचं काम सुरु आहे ते बंद केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.