मुंबई : दहावी हा शैक्षणिक कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा. या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. शिवाय दहावीतले विषय पक्के होणे, पुढील शिक्षणासाठी गरजेचे असते. त्यामुळेच या परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी गरज असते, योग्य त्या मार्गदर्शनाची. त्यासाठीच ‘लोकसत्ता यशस्वी भव’ ही दैनंदिन लेखमाला सोमवारपासून चालवण्यात येणार आहे. लोकसत्तेच्या रोजच्या अंकात ही लेखमाला विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे.
करोनानंतर अभ्यास पद्धतीत करावयाचे बदल, लेखन कौशल्ये, सराव, कृतीपत्रिका, विषय समजून घेण्याच्या युक्त्या, प्रयुक्त्या अशा अनेक गोष्टी या लेखमालेत सांगितल्या जातील. त्याचबरोबर अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि सरावासाठी भरपूर प्रश्न मिळतील. राज्यभरातले अनेक तज्ज्ञ शिक्षक या लेखमालेतून मार्गदर्शन करणार आहेत. टीजेएसबी बँक लिमिटेड या लेखमालेचे प्रायोजक आहेत.