राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं मुंबईत आज ( २१ एप्रिल ) मार्गदर्शन शिबीर पार पडलं. या शिबिराला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांकडून नेत्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईवरून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. ईडी आणि सीबीआय चौकशी ही घराघरात माहिती झाली, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाच्याबाबतही बोलताना मोठा दावा केला आहे. “जळगावातील आपले एक सहकारी आहेत. एकेकाळी ते भाजपाचे नेते होते. त्यांनी भाजपा सोडल्यावर त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली. आज सव्वा दोन वर्षे झाली, त्यांच्या जावयाची केस न्यायालयात नेण्यात येत नाही.”
हेही वाचा : “गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!
“त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं आहे. त्या तुरुंगात असलेल्यांनी सांगितलं की, जर त्यांच्यावरील खोटी केस मागे घेण्यात आली नाही. अथवा निकाल लवकर लागला नाही. तर, खडसेंचे जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सुरू आहे,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे.
हेही वाचा : “शरद पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे अजितदादांना मविआतून बाहेर…” भाजपा खासदाराचा दावा
“मी ग्रामीण भागात जातो. तिथे दोन मुलांत भांडण झालं, तर पहिला दुसऱ्याला म्हणतो की गप्प बस नाहीतर तुझ्यामागे ईडी लावेन. ईडी आणि सीबीआय हा शब्द घराघरांत माहिती झाली आहे. कारण, सत्तेचा गैरवापर होत आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.