मुंबई : गावाकडे आणि पुढे गडाकडे जाणारी एकच पायवाट, त्या पायवाटेवर लागणारी वस्ती, वस्तीवरील घरातून मिळणारा चहानाष्टा आणि गडावर असलेले दोन तंबू.. इरशाळवाडीवर डोंगर कोसळल्याचे वृत्त समजताच इरशाळगडाची नियमित चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या डोळय़ांसमोर या परिसराच्या आठवणी तरळल्या. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर दिसणाऱ्या चित्रफिती, छायाचित्रांमध्ये चिखलाखाली गाडल्या गेलेल्या गावातील पायवाटेच्या खुणा कुठे कुठे दिसत होत्या. पण त्या पायवाटेवर भेटणारी, हास्यविनोद करणारी माणसे पुन्हा भेटतील का, हाच प्रश्न या हौशी गिर्यारोहकांना सतावत होता.
मुंबईपासून सुमारे ८० किमी अंतरावरील चौक आणि मानिवली गावापासून सुमारे ८०० फूट उंचीवर दुर्गम भागातील डोंगरावरील इरशाळगडाच्या वाटेवर इरशाळवाडी विसावली आहे. वाहनाने मौजे चौक मानवली गावात पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. वर जाणारी ती एकमेव पायवाट. इरशाळवाडीत जाणारी आणि पुढे काटय़ाकुटय़ातून गडापर्यंत नेणारी. तेथे ‘रॉक क्लायिम्बग’ करून गड सर करावा लागतो. सुमारे आठेक वर्षांपूर्वी गिर्यारोहकांना इरशाळवाडी ‘ट्रेक’चा शोध लागला. तेव्हापासून कठीण पायवाट आणि प्रस्तरारोहणाचा थरारक अनुभव घेण्यासाठी अनेक गिर्यारोहक इरशाळगडाला भेट देऊ लागले आहेत, असे गिर्यारोहक संदीप आठवले यांनी सांगितले. पावसाळय़ात शेती आणि त्यानंतर चौक मानिवली आणि आसपासच्या परिसरात मोलमजुरी हेच वाडीवरील ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन. गिर्यारोहकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना अर्थार्जनाचे नवे साधन सापडले. गिर्यारोहकांसाठीही इरशाळवाडी म्हणजे पुढच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरू लागले. गावात गिर्यारोहणाची प्राथमिक जुळवाजुळव करूनच गिर्यारोहक गडाच्या दिशेने कूच करू लागले, असे ते म्हणाले.