डॉ. आर. डी. खानोलकर हायस्कूल मठ (वेंगुर्ला) या हायस्कूलमधून १९६३ ते १९८९ दरम्यान शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या भव्य सभागृहात एकत्र आले होते. त्यांना एकत्र आणण्याचे काम केले होते माजी मुख्याध्यापक आर. पी. जोशी यांनी. निमित्त होते २६ जानेवारी २०१३ रोजी साजरा होणारा हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव.
या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थी मेळाव्याचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते. शालेय जीवनात पुत्रवत प्रेम करणाऱ्या आर. पी. जोशी यांना भेटण्यासाठी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने आले होते. सरांनी केवळ शिक्षादानाचेच कार्य केले नाही तर अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. कित्येक मुलांना आपल्या घरी नेऊन शिक्षणाची दीक्षा दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्या घराचे दरवाजे सताड उघडले. त्यांनी दाखविलेल्या औदार्यामुळेच आज या हायस्कूलमधील अनेक विद्यार्थी चांगल्या हुद्दय़ावर जाऊन पोहोचले. आपल्या गुरुजनांबद्दलच्या आत्मीयतेमुळेच पन्नाशी ओलांडलेले विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सभागृहात उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी गुरुजींचे ऋण व्यक्त केले. आपली शाळा आणि गुरुजींबद्दल बोलताना अनेक विद्यार्थी भावुक झाले होते. कोपर रोड येथे राहणाऱ्या प्रतिभा गावडे या विद्यार्थिनीला आपले अश्रूही लपविता आले नाहीत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शशिकांत परब, नामदेव गावडे, मंगलदास ठाकूर, प्रभाकर परब, संजय राणे, अशोक शेणई आदींनी मेहनत घेतली. लोकसेवा समितीचे अध्यक्ष भरत सुर्वे, माजी अध्यक्ष विष्णू सकपाळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य आत्माराम नाटेकर यांच्या हस्ते आर. पी. जोशी यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अधिक माहितीसाठी आर. पी. जोशी (०२३६६-२६२२६०/९८२१२६२५९६) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा