ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील चोंढे येथील घाटघर जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू करण्यात आलेली काही कार्यालये आता बंद होत आली तरी प्रकल्पग्रस्त म्हणून रोजंदारी तत्त्वावर कार्यरत ११ कामगार त्यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ कोकणकडा येथे ३ ते ५ डिसेंबरदरम्यान उपोषण करणार आहेत. त्यानंतरही शासनाने याप्रकरणी लक्ष न घातल्यास वीजनिर्मितीसाठी ऊध्र्व धरणातून सोडण्यात येणारे पाणी चाकबंद आंदोलन करून रोखण्यात येईल, असा इशारा संबंधित कामगारांनी दिला आहे. कामगारांच्या या आंदोलनामुळे येथील वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.
घाटघर जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यानंतर ६९ प्रकल्पग्रस्तांना रोजंदारी पद्धतीने कामावर घेण्यात आले. त्यापैकी पाच जणांना रुपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्यात आले, तर ५३ जणांना २० मे २००५ मध्ये सामावून घेण्यात आले. उर्वरित ११ मजूर मात्र १३ वर्षांपासून रोजंदारीवरच कार्यरत आहेत. त्यातील मजूर लक्ष्मण नवसू नवलकर हा आता निवृत्तही झाला.
दरम्यान, शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे हे कामगार शनिवार-रविवारची सुट्टी, वैद्यकीय रजा आदी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याविषयीचा प्रस्ताव पाच-सहा वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविला असल्याची माहिती जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम. के. थोरात यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा