मुंबई : वांद्रे येथील एका विकासकाच्या मोटरगाडीत ठेवलेली सुमारे २५ लाखांची रोकड चोरून पळून गेलेल्या आरोपी चालकाला ठाण्यावरून अटक करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. गुरुदेव सुभाष पाटील असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २३ लाख ७२ हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरोधात यापूर्वी धारावी पोलीस ठाण्यात तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले.
नावेद मोहम्मद सिद्धीकी हे विकासक असून वांद्रे परिसरात राहतात. २० फेब्रुवारीला त्यांनी कामानिमित्त कार्यालयात २५ लाख रुपयांची रोकड आणली होती. ती रोकड त्यांनी मोटरगाडीत मागे ठेवली होती. त्यानंतर ते कामानिमित्त वाकोला व नंतर वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गेले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र गौरव अरोरा हा मित्र हादेखील होता. म्हाडा कार्यालयात जाताना त्यांनी गुरुदेवला कारमध्ये २५ लाखांची रोकड असल्याची कल्पना देऊन त्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. दुपारी दिड वाजता म्हाडा कार्यालयातील काम संपवून ते त्यांच्या मोटरगाडीजवळ आले. यावेळी तेथे गुरुदेव आणि मोटरगाडी दोघेही नव्हते. त्यामुळे त्यांनी चालकाला दूरध्वनी केले, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कार्यालयातील एका व्यक्तीला मोटरगाडी इलेक्ट्रीसिटीसमोर उभी असल्याचे सांगितले. त्यांनी पाहणी केली असता मोटरगाडीमध्ये २५ लाखांची रोकड नव्हती. गुरुदेव हा २५ लाखांची रोकड घेऊन पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल बंद होता.
अखेर त्यांनी याप्रकरणी खेरवाडी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविराज जांभळे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार मोरे, पवार, ठोंबरे, पोलीस शिपाई सरवदे, पाटील, गायकवाड यांनी तपास सुरु केला. तपासादम्यान गुरुदेवविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीनंतर संबंधित पथकाने ठाणे रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून गुरुदेवला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्यानेच २५ लाखांची रोकड चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २३ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या पाचशे जप्त केले आहेत. आरोपीविरोधात धारावी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.